Wednesday, September 7, 2011

परिवार संकल्पना

"हे विश्वची माझे घर" , "चिंता करितो विश्वाची" हे   अनुक्रमे संत ज्ञानेश्वरांचे आणि संत रामदासांचे उद्गार सुपरिचित आहेतच. हे महात्मे असे होते ज्यांनी संपूर्ण समाजालाच आपलं  समजून प्रत्येक घटकालाच आपले सगे-सोयरे करून सतत त्यांच्यासाठीचाच विचार केला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी तर पसायदान रुपी  परमपवित्र मागणं या विस्तृत समाजासाठीच तर मागितलं आणि शिवाय समाजातले जे वाईट चालीरीतींचे, विचारांचे लोक आहेत त्यांची भ्रष्ट झालेली बुद्धी सत्कर्मासाठी जास्तीत जास्त कारणी लागो ज्याद्वारे आपोआप त्यांच्या गैर मार्गाने जाणाऱ्या बुद्धीचे रुपांतर सद्बुद्धीत होईल असं दान देवाकडे मागितलं ज्यात सकल समाजाचं हित आहे. 
                                                     "जे खळांची व्यंकटी सांडो,
                                                       तया सत्कर्मी रति वाढो"
असं मागणं तेव्हाच मागितलं जातं जेव्हा समस्त समाजाला त्याच्या गुण-दोषांसह आपण स्वीकारतो. 
"परिवार" ही संकल्पना आपण या महात्म्यांकडून शिकावी आणि आचरणात आणावी असं वाटतं. 
सामान्य माणसांच्या आयुष्यात "कुटुंब" ही एक सीमित, मर्यादित संकल्पना असते; जिथे केवळ "माझं घर",
"माझ्या घरातली माणसं", "त्यांची सुख-दुःख", "त्यांचं यश-अपयश" या गोष्टींचाच बहुतेकदा विचार असतो. 
हीच संकल्पना अधिक व्यापक होऊन त्याचं रुपांतर अशा एका भव्य सूत्रात व्हायला हवा, ज्यायोगे, व्यक्ती-व्यक्तींमधला आप्तभाव, परस्परांबद्दलची संवेदनशीलता वाढीस लागेल.
             "कुटुंब" हा आपल्या समाज रचनेतला एक पायाभूत घटक. कुटुंबातूनच व्यक्ती समाजात वावरण्यासाठी 
सक्षम होत असते. संस्कार, नियम, योग्य-अयोग्य या सर्व गोष्टी व्यक्तीला कुटुंबातच प्रथम शिकायला मिळतात; त्यामुळे व्याक्तीविकासासाठी कुटुंब ही एक मुलभूत रचना आहेच, परंतु, या व्याक्तीविकासाच्या शृंखलेत व्यक्तीचे समाजाप्रती दायित्व हा एक महत्वाचा घटक अंतर्भूत असायला हवा. या घटकामुळे व्यक्तीचा प्रवास कुटुंबाकडून अधिक विस्तृत समष्टी परिवाराकडे आणि मग विश्व कल्याणाकडे होईल.
              हा विषय मांडताना हेच सूत्र मनात ठेवलं, ते म्हणजे "परिवार" ही एक व्यापक संकल्पना आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीने अंगी बाणवावी, कारण, संकल्पनेच्या आधीही ती एक "मानसिकता" आहे जी व्यक्तीला त्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करते. 
काही व्यक्तींच्या आयुष्यात असे परिवार निर्माण होतात ज्यात त्यांनी केवळ स्वतःचा विचार, केवळ स्वतःच्या आप्तस्वकीयांचा विचार न करता त्याहीपेक्षा व्यापक कुटुंबाचा विचार केलेला असतो आणि ती व्यक्ती त्या परिवारातच एवढी समरस होते कि तिचं असं वेगळं अस्तित्व भासतच नाही. 
आता स्व.बाबा आमटेंच्या आनंदवनाच उदाहरण! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या सहाय्याने समाजातल्या एवढ्या दुर्लक्षित घटकांसाठी काम करणं ज्यांना समाज स्वीकारायलाच काय पण स्पर्श करायलाही तयार नाही..! केवढी हि तपस्या!!  
ही तपस्या यशस्वी होण्यात त्यांनी आपल्या कुटुंबावर केलेल्या समाजसेवेच्या संस्कारांचा मोलाचा वाटा आहे.
असे संस्कार कुटुंबाच्या स्तरावर करून विस्तृत परिवार कल्याणाच बीज अंकुरित होण्यास फारसा अवधी लागणार नाही.
अशा अनेक परिवारांची निर्मिती समाजातील प्रत्येक घटकाला परिस स्पर्श करणारी अशी एक शक्ती ठरू शकते.
माणसाच्या मनाची व्यापकता जेवढ अधिक तेवढी ती शक्ती जास्त आणि ती शक्ती जेवढी जास्त सर्वव्यापी तेवढी कार्याची व्यापकता अधिक..अशा तर्हेने ही शृंखला अबाधित ठेवल्यास प्रत्येक व्यक्ती कार्यप्रवृत्त होण्यास वेळ लागणार नाही आणि संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाला खरा अर्थ लाभेल आणि त्या दानासाठी आपण पात्र ठरू.