Thursday, October 8, 2015

सेल्फी

                                                                 

असच एकदा रस्त्यातून जात असताना अनेक तरुण तरुणी, कुमारवयीन मुलामुलींचे तसेच मध्यमवयीन महिलांचे गट एका गोष्टीमध्ये रममाण झालेले, गुंतलेले मी पहिले आणि वाटलं “सेल्फी” काढण्यात किती विरघळून गेलेत हे सर्वजण! निसर्गरम्य वातावरणात एखादी छानशी पार्श्वभूमी निवडून त्यावर हा ‘सेल्फी’ तर खूपच सुंदर दिसतो म्हणे.. कॅमेऱ्याचा उपयोग खरा तर आयुष्यातील अविस्मरणीय सुंदर क्षण किंवा  घटना  टिपण्यासाठी होत होता , परंतु आता प्रत्येक क्षणीच तो वापरून आपल्या आयुष्याचा तो अविभाज्य भागच झालेला आहे.  जागोजागी, रस्तोरस्ती हे “सेल्फिमय” लोक दिसतात आणि एकच विचार मनात येतो तो म्हणजे जसा रोजच्या रोज आपल्या  चेहऱ्याचा सेल्फी निघतो , तसा सेल्फी घेणारा एकतरी माणूस अंतर्मनाचा ठाव घेतो का?!?
 आपले विचार, मतं, तत्त्वं यांचा सेल्फी घेण्याचं मध्यम काय असावं, याचा विचार करताना कोणी दिसतो का?...नुसतेच चेहऱ्यावर हसू ठेवून चेहऱ्याचा सेल्फी निघेल खरा पण तुमच्या मनाच्या चेहऱ्याचा रंग तुमच्या बाह्य चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत असतो हे तेव्हाच कळेल जेव्हा प्रत्येक नात्यात एकमेकांबद्दल संवेदनशीलता असेल आणि एकमेक परस्परांच्या मनांचाही ठाव घेतील.
समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा मागोवा घेतल्यावर असं वाटतं की, परस्पर नातेसंबंध एवढे प्रदूषित होऊ लागलेत की त्यामुळे जीवनातला आनंद अनुभवण्यापेक्षा मनस्तापच माणसांच्या वाट्याला येतो आणि या नात्यांवरचा विश्वासच उडून जातो. यासाठी माणसांची मनं फार प्रगल्भ होण्याची आवश्यकता आहे. स्वतःबरोबरच आपल्या सोबतच्या सर्वांमध्ये उत्तमोत्तम विचारांची रुजवण करण्याचा प्रयत्न केला तर सर्व समाजच सुंदर बनेल आणि बाह्य सौंदर्य कॅमेर्यात सतत टिपत राहण्याची गरज संपुष्टात येईल.  
परमेश्वराला त्याचा सेल्फी आपल्या सर्वांच्या बरोबर घ्यावासा वाटला तर त्याच्याही पदरी निराशा आल्यावाचून राहणार नाही..याचं कारण एकच ते म्हणजे त्या सृष्टीच्या निर्मात्याला   आपल्या चेहऱ्यावरचे फक्त “सेल्फी’’ साठी चेहऱ्यांवर आणलेले हसू समजल्याशिवाय राहणार नाही.

याचसाठी आपल्या व्यक्तींसाठी आपल्या मनाचाच  देव्हारा इतका सुंदर, निर्म हवा  की इतर कोणत्याही background frame ची गरजच भासणार नाही. 

Wednesday, October 10, 2012

मन चिंती ते वैरीही न चिंती .....


  
मनाला आवर घाला,सावरा,सुधारा असं म्हणणं खूप सोपं असतं परंतु ते              
कृतीत उतरवणं हे महाकठीण..! मनाचा वेग प्रकाश वेगापेक्षाही अधिक आहे
असं म्हणतात . कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आणि केल्यानंतर मनाचा
त्या गोष्टीला पूर्ण पाठींबा आणि सहकार्य असणं हे फार आवश्यक असतं. 
अनेकदा माणूस मन आणि कृती यात साधर्म्य नसल्याने पश्चात बुद्धीला
शरण जाताना दिसतो,परंतु तेव्हा काहीही करणं शक्क्य नसतं कारण 
हातातून वेळ निसटून गेलेली असते. मनाचा जसा वेग जास्त तसाच वेळेचाही 
आहेच,म्हणूनच म्हणतात की, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. त्याचप्रमाणे
कृती हातून घडली की ती माणसाच्या हातावेगळी झालेली असते. 
असं असलं तरीही मन आणि बुद्धी यात सतत सुसंवाद ठेवल्यास कृतीवर
नियंत्रण नक्की मिळवता येतं. 
आजकाल असं चित्र दिसून येतं की माणूस स्वतःलाच अत्त्यंत दुय्यम दर्जाची 
वागणूक देतो. तेच तेव्हा त्याला योग्य वाटतं परंतु त्यानंतरचे परिणाम काय होतील 
याची त्याला जाणीव होत नाही. सध्या आपल्या आजूबाजूला वरचेवर ऐकू येणाऱ्या घटना म्हणजे
आत्महत्त्या, दरोडा,हाणामाऱ्या, चोऱ्या, कौटुंबिक असलोखा आणि भांडणं  
आणि बरंच काही....ऐकून मन विषण्ण होतं. 
माणूस एकीकडे स्वतःची ओळख निर्माण करण्याकरता झगडतोय परंतु त्यातल्या अपयशामुळे,
विचारातल्या अप्रगल्भतेमुळे स्वतःची ओळख निर्माण करण्याऐवजी अधोगतीकडे चालला आहे. 
याला कारणीभूत घटक म्हणजे स्व-आदराची भावना नसणे आणि स्वाभिमानाची कमतरता असणे.
ज्याला मानस शास्त्रीय भाषेत  lack of self-respect  आणि self-esteem असं म्हणतात. 
जोवर स्वतःला आदर दिला जात नाही तोवर समाजात वावरताना स्वतःसाठी योग्य काय
आणि अयोग्य काय हे समजणं अशक्क्य आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या वागण्याने दुसऱ्याला 
काय वाटेल हे समजणं तर त्याहून दुरापास्त! म्हणूनच आज व्यक्ती आणि समाज यात प्रचंड
दरी निर्माण झालेली दिसते. हेच काय, पण १०वी ची परीक्षा दिलेल्या अपयशाच्या कारणाने 
स्वतःचा जीव संपवणाऱ्या मुलांना आपल्या आई-वडिलांच्या भावनांचं काहीच वाटू नये? 
स्वतःचा संसार थाटून झाल्यावर, आपली मुलं मोठी झाल्यावर आपल्या वृद्ध आई वडिलांना 
वृद्धाश्रमात टाकणार्यांच्या मनांना काहीच वेदना होऊ नयेत? ..परवाच वर्तमानपत्रात 
वाचल्याप्रमाणे आईने खूप रडणाऱ्या आपल्या बाळाला मारून टाकलं..किती ही मानसिक विकृती! 
मातृत्वावरचा विश्वास उडावा अशी बातमी होती ती. हीच गोष्ट मी काहीजणांना सांगितली तर 
पहिला प्रश्न हाच की, ती मुलगी होती की मुलगा? हा अपेक्षित प्रश्नच नव्हे पण आज समाजाच्या
मनात आजूबाजूच्या परिस्थितीमुळे किती संकुचितता निर्माण झाली आहे हे समजतं.  
समाजमन तेव्हाच सशक्त होईल जेव्हा प्रत्त्येक व्यक्ती आपली कृती करताना स्वतःच्या आणि इतरांच्या
हिताचा विचार करेल. वैयक्तिक संवेदनशीलताच सामाजिक संवेदनशीलतेला जन्म देऊ शकते. 
एकदा समुपदेशन करताना एका तरुण मुलाच्या तोंडचे उद्गार असे होते की, मला परदेशी
शिकायला जायचं एक महत्वाच कारण म्हणजे मला आई बाबांच्या पिंजर्यात अडकायचं 
नाहीये..मी विचारलं,अरे, शिकायला जाणार न तू? मग असं का म्हणतोस? तर म्हणे, 
ते तर आहेच पण आई बाबा नसणार हा माझ्यासाठी bonus आहे...थक्क झाले मी ऐकून.
यात पालकांचीही बरीच चूक आहे हे अमान्य करताच येणार नाही. अशावेळी पालकांनी विचार करावा,
आयुष्यभर  जे केलं, त्याचं फलित हेच? मग आपण कुठे कमी पडतोय का?..
केवळ गरजा भागवणं, वेळेला कौतुक करणं, चार लोकांच्यात त्याची चर्चा करणं म्हणजे मुल 
वाढवणं आहे का? याचा खरच विचार पालकांकडून होण्याची गरज आहे. 
''मन चिंती ते वैरीही न चिंती'' एवढ्यासाठीच म्हणावसं वाटतं की मन जसं  आपला सखा 
होऊ शकतं तसंच शत्रूही....आणि अशा अधोगतीकडे घेऊन जाऊ शकतं की आपला 
हाडाचा वैरीही आपल्याशी तसा वागू शकणार नाही. 
म्हणूनच ''मनोरथाचे" सर्व दोर आपल्याच हातात आणि त्याची दिशाही ठरवायची आपणच
की जी आपल्याला उन्नतीकडे घेऊन जाईल त्याचप्रमाणे आपल्याशी निगडीत समाजाचाही
त्यामुळे नुकसान तर होणारच नाही परंतु परस्परात आपुलकीचं,विश्वासाचं आणि मित्रत्वाच 
नातं निर्माण होईल जिथे वातावरणातल्या वाईट वृत्ती- प्रवृत्तींना थाराच राहणार नाही आणि
सर्वांचा प्रवास जीवनाच्या सकारात्मकतेच्या दिशेने सुरु होईल. 

Friday, August 17, 2012

.. साधना ..


     ''सिद्ध करते साधकाला जीवनाची साधना'' असे म्हणतात. साधकाला साधनेशिवाय काही अस्तित्वच नाही,किंबहुना पूर्णत्व नाही. डोळसपणे केलेल्या साधनेमुळेच  मिळालेल्या ज्ञानकणांचा पूर्ण अभ्यास साध्य होतो. डोळसपणे केलेली साधना एवढ्यासाठी की, गुरूने दिलेल्या मंत्राला आत्मसात करणे म्हणजे  त्याचा संपूर्ण बारकाईने, स्वतःचे संदर्भ, अनुभव त्याच्याशी निगडीत करून केलेले आचरण..हे त्यालाच शक्क्य आहे जो गुरूने दिलेला मंत्र स्वतःचा जीवनमंत्र म्हणून जोपासण्यासाठी सज्ज असतो. 

          गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नसून ते एक ''तत्त्व'' आहे, ज्यापुढे 'साधक' या भूमिकेतला प्रत्त्येकजण नतमस्तक असतो. हे तत्त्व कधी व्यक्तीत, कधी अनुभवात,कधी परिस्थितीत तर कधी विचार रूपाने प्रत्येकाला गवसत असते. या तत्त्वाप्रती नितांत श्रद्धेने, आदरभावनेने आणि प्रामाणिकपणाने समर्पित असलेलाच त्याच्या प्रगल्भतेचा आणि त्यातल्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. 
         
             पूर्वीच्या काळी गुरु-शिष्य परंपरेत गुरूगृही निवास करून ज्ञान संपादन करण्याची पद्धत होती. तिचा गाभा आणि मूळ अर्थ हाच असावा की, ज्ञान संपादनासाठी त्या अनुषंगाने येणारे, करावे लागणारे काम म्हणे त्या ज्ञानाचाच एक भाग. ते लादले गेलेले, सक्ती करून करवून घेतले जाणारे काम नव्हे. म्हणजेच ''ज्ञान" म्हणजे केवळ एका विषयाचे अध्ययन न मानता जीवनावश्यक तत्त्वज्ञानाचे त्या त्या तात्कालिक विषयांच्या माध्यमातून प्राप्त होणारे ज्ञानधन असे मानले जात असे. 
         
            आजच्या संदर्भात बघितले तर 'समर्पण भाव बऱ्याच अंशी व्यावहारिक सोयीनुसार आणि दृष्टीकोनातून तोलला जातो असे वाटते. परवाच 'सरगम' नावाचे एक सुंदर नाटक बघितले खूप वेगळा विचार करून प्राचीन गुरु शिष्य परंपरा आणि आत्ताचा आधुनिक विचार,संकल्पना यावर बेतलेली अतिशय सुंदर कलाकृती खूप दिवसांनी पाहायला मिळाली.  एका मध्यमवर्गीय कुटुंबातलीअसामान्य स्वरज्ञान लाभलेली एक शाळकरी मुलगी,मानसी तिचे नाव. संगीताचे शिक्षण एखाद्या बुजुर्ग गुरूंकडून मिळावे  अशी तिच्या आई वडिलांची इच्छा. शाळेतल्या एका गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे  बक्षिस मिळूनही अतिषय निराश होऊन घरी परतते. आई वडिलांना प्रश्न पडतो की, पहिला क्रमांक येऊन देखील ही एवढी दु:क्खी का? ..
..पण तिने दिलेले  उत्तर ऐकून आपल्याही काळजात लक्कन काही हलल्यासारखे होते ती सांगते, ''मी मधेच बेसूर झाले, आणि बाई  म्हणाल्या की, अगं इथे कोणालाही कळलं नाही तू चुकलीस..म्हणून मला राग आलाय त्यांचा फार.''
आज म्हणजे क्रमांकासाठीच्या चढाओढीत  स्वतःचा सूर गमावून बसतात मुले ...पण अशी मानसी विरळाच..! 
   
                 त्यावेळी घरी आलेले एक पाहुणे सदगृहस्थ ''केदारनाथ'' नावाच्या शास्त्रोक्त संगीताची साधना करणाऱ्या आणि जगभर ख्याती असलेल्या व्यक्तीचे नाव तिच्यासाठी संगीताचे गुरु म्हणून सुचवतात. अत्यंत शिस्तप्रिय, रागीट, कठोर अशा समजल्या जाणाऱ्या केदारनाथांकडे मानसीचे वडील पोहोचतात खरे पण सुरुवातीला त्यांना पूर्ण नकारालाच सामोरे जावे लागते. बऱ्याच प्रकारे विनंती केल्यावर  केदारनाथांचा होकार मिळतो खरा पण एका अटीसह! ती अट म्हणजे मानसीने त्यांच्याकडेच राहून संगीतसाधना करायला हवी, तरच शास्त्रोक्त संगीताचे धडे ती नीट गिरवू शकेल. वडिलांचे  हृदय ते..! मान्य करायला आधी कठीण जाते  पण आपल्या कन्येला जर संगीत साधनेचे  समाधान मिळवून द्यायचे  असेल आणि खऱ्या  अर्थाने तिला संगीत साधक करायचे  असेल तर हे मान्य करण्यावाचून पर्यायच उरत नाही. केदारनाथांसारखे  गुरु लाभल्यावर या अटीचे  काही  वाटत नाही.   केदारनाथांच्या घरी पूर्णवेळ राहून, शाळा, अभ्यास सांभाळून मानसीचा संगीताचा रियाजही चालू होतो. केदारनाथ आणि त्यांच्या पत्नीही तिचा स्वीकार अगदी मुलीसारखा करतात.  केदारनाथांचे घर म्हणजे मानसीसाठी जणू "स्वर मंदिर'' होऊन जाते

                                        
घरामध्ये जणू  तानपुऱ्याच्या सुरांबरोबर मानसी आणि केदारनाथांचा सूरही जुळतो. काही दिवसानंतर तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिका तिचे नाव एका टी.व्ही. वरील वाहिनीच्या महागायिकेच्या स्पर्धेसाठी पाठविण्यासाठी केदारनाथांची संमती घ्यायला येतात. तिचे वय आणि तिची संगीतातली तयारी पाहता केदारनाथ स्पष्ट नकार देतात, परंतु तिचे पालक सर्व करारांवरती सह्या करून तिला स्पर्धेसाठी पाठवतात.
     
                   स्पर्धेत मानसीचा पहिला क्रमांक येतो खरा पण केदारनाथ तिला शिकवण्यास मात्र नकार देतात. त्यांना पूर्ण कल्पना असते ती, या प्रलोभनांमुळे वहावत  जाणाऱ्या या बालमनांची..! या सर्व आकर्षणापुढे ही मुले  साधनेला  अपेक्षित महत्व देऊच शकणार नाहीत असा त्यांचा ठाम विश्वास असतो. 

मानसीने संगीताच्या रियाजाबरोबरच शाळेचा अभ्यास सुद्धा तितकाच लक्षपूर्वक करावा  अशी त्यांची इच्छा असते. म्हणजेच शालेय अभ्यासाला देखील कलेबरोबरच समान न्याय हा आजच्या काळात खरा असणारा आणि ठरणारा विचार मानसीने कृतीत आणावा अशी त्यांची इच्छा असते.,परंतु, स्पर्धेतील बक्षिसासोबत मिळणारी  तात्पुरती प्रसिद्धी, नंतरचे कार्यक्रम, त्यात कपडे, रंगपट यांना दिले जाणारे अवाजवी महत्व यात मानसी पुरती अडकून जाते..तिचा काहीच दोष नसताना!! 
         
           केदारनाथांसारखे गुरु गमावल्याचे  दुःक्ख  आणि स्वतःच्या मनानुसार साधेपणाने कला जपण्याचे  संपलेले  स्वातंत्र्य यामुळे अतिषय निराश झालेली मानसी केदारनाथांशिवाय अन्य कुठेही  शिकण्यास नकार देते..केदारनाथ आणि त्यांच्या पत्नींनी आपल्या मुलीच्या लहानपणी झालेल्या निधनानंतर  जपलेला तानपुरा 
मानसीला रियाजासाठी देऊन  आपलीच मुलगी मानली आहे हे समजल्यावर मानसीच्या आई वडिलांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहतात...परंतु, आई वडिलांसमोर प्रश्न उभा राहतो तो तिच्या पुढील संगीत अध्ययनाचा. यातून सुटण्याचा एकच मार्ग दिसत असतो, तो म्हणजे सर्व करारांमधून मुक्तता करवून घेणे. 
         
            एक दिवस मानसी आणि तिचे आई वडील तडक पोहोचतात ते केदारनाथांच्या घरी.. मानसी तोच तानपुरा घेऊन गायला बसते. केदारनाथ बाहेरून येऊन हे दृश्य 
पाहून  रागावतात..यावर मानसी सांगते की तुम्ही शिकवले नाहीत म्हणून एकलव्यासारखे तुमच्या सीडीवरून मी ही बंदिश बसवली..हे ऐकून केदारनाथ रागावतात तसेच खूप हळवेही होतात मानसीची गुरुवारची निष्ठा पाहून! मानसीचे वडील केदारनाथांना सांगतात की मध्यमवर्गीय कुटुंबातला मी एक साधा संगीत  शिक्षक..या स्पर्धांमधून मिळणाऱ्या पैशांना, प्रसिद्धीला मीच भाळलो आणि मानसीचे नाव पुढे केले..पण तिला एवढ्या मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार हे कळताच मी ते सर्व करार रद्द करवून घेतले आहेत..टीव्ही वरील कार्यक्रमाचे निर्मातेही मानसीच्या निष्ठेची प्रशंसा करतात. मानसीला तिला तिचा खरा सूर गवसतो.   ''मला आस सूर्याची, नका दावू काजवे'' अशा आशयाचे गीत तिच्या तोंडी अगदी चपखल वाटते.. 
अशी "मानसी" प्रत्त्येक संगीतसाधना किंवा अन्य कोणतीही साधना करणाऱ्यात असायला हवी,तसेच शिष्याप्रती देखील एवढे प्रेम, निष्ठा असणारे"केदारनाथांसारखे"गुरुही असायला हवेत म्हणजेच कला ही खरोखरच ईश्वरीय शक्तीपर्यंत घेऊन जाणारे माध्यम आणि कलाकार म्हणजे त्याच ईश्वरीय शक्तीचा उपासक असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल. 

Thursday, August 9, 2012

शाळेत समुपदेशन कशासाठी???

                                             
शालेय जीवनात माणूस एक अत्यंत सुंदर, मनमोकळ आयुष्य जगत असतो. संस्कारक्षम वयामध्ये शाळेत होणारे संस्कार म्हणजे पुढल्या आयुष्यभराची शिदोरी असते. मानसिक आणि शारीरिक बदलांमधून या काळात प्रत्येकजण जात असतो. याच बदलाच्या काळामध्ये गरज असते ती चांगल्या मित्रांच्या संगतीची, शिक्षकांच्या आपुलकीची आणि पालकांच्या प्रेमाची! मनाला उत्तम शिस्त लावण्यासाठी पोषक वातावरण जसं घरी असायला हवं तसंच  शाळेतही असायला हवं कारण मित्र मंडळींचा आणि शिक्षकांचा खूप मोठा पगडा या वयात मुलांवर असतो. ते सांगतील तसंच करण्याकडे कल असतो. या सर्व प्रक्रियेमध्ये शिक्षकांचा आणि पालकांचा खूप मोठा वाटा तर असतोच पण त्यांच्यावर खूप महत्वाची जबाबदारीही असते. 
आजकाल असं दिसून येतं की, एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात आल्याने मुलाला आई,बाबा आणि एखादं भावंड एवढाच परिवार असतो. 
आई - बाबा तर नोकरीच्या कारणाने बरेचसे बाहेर, त्यामुळे मुलाशी घरात बोलायला, गप्पा मारायला दिवसभर कुणीच नाही अशी परिस्थिती असते.
आजकाल संस्कार शिबिरांमधून "आजीच्या गोष्टी'' असं वेगळं सत्र ठेवलं जातं! यावरूनच लक्षात येतं की आजीच  घरात नाही तर मुलाला आजीच्या गोष्टी मिळणार कुठून?  मुल शाळेमध्ये येतं तेव्हा त्याने एका विशिष्ट शिस्तीतच वागणं अपेक्षित असतं, अभ्यास वेळेत पूर्ण करणं  अपेक्षित 
असतं नाहीतर शिक्षकांकडून ओरड होतेच..! म्हणजेच या सगळ्यात मुलांकडून फक्त "अपेक्षांची" ओझी वाहून घेतली जातात असं वाटतं. 
मुलांना अशी एक हक्काची जागा,जिथे  ती आपलं मन मोकळ करू शकतात, आपल्या अडचणी मोकळेपणी सांगू शकतात ती म्हणजे "समुपादेशानासाठीचे दालन "! 
 आता मुलांनी नुसतंच  येऊन समुपदेशकाशी गप्पा मारणं अपेक्षित आहे का? तर आहे पण त्या गप्पांमधून त्या मुलाची जी समस्या आहे तिला हात घालणं आणि त्यामुळे त्याच्या वर्तवणुकीत जे दोष निर्माण झालेले आहेत जे त्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या आड येताहेत किंवा
ज्यामुळे अन्य मुलांपेक्षा वेगळं असण्याची भावना त्याच्यामध्ये उत्पन्न झालेली आहे ती घालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे. 
''Psychotherapy"  च्या माध्यमातून बौद्धिक,भावनिक आणि वागणूक विषयक अपेक्षित सकारात्मक बदल हे काम समुपदेशकाने करणं आवश्यक आहे. 
खरं तर समुपदेशन हा पूर्ण प्रक्रियेचा खूप छोटा भाग आहे,त्यामुळे आजकाल ''school counselor''  ऐवजी ''school psychologist'' ही संकल्पना मूळ धरते आहे. मानस शास्त्रज्ञ हा मुलाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्व घटकांबरोबर( शिक्षक,पालक आणि संस्थाचालक) काम करणं अपेक्षित आहे.
मुलाच्या समस्येविषयी शिक्षकांना,पालकांना आणि मुख्याध्यापकांना जागरूक करणं हे त्याचं मुख्य काम आहे,जेणेकरून त्याविषयी हे सर्वजण सतर्क राहावेत असं अपेक्षित आहे. मूलतः शाळेतील मानस शास्त्रज्ञाने मुलं आणि अन्य संबंधित घटक यांमधील महत्वाचा दुवा बनून राहण्याची आवश्यकता आहे.  
सध्या शाळांमधून समुपदेशकाची नेमणूक होत असली तरीही त्याच्या भूमिकेबद्दल अजूनही आपल्या समाजात खूप कमी जागरूकता आहे. त्याच्या भूमिकेविषयी संस्थांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं आवश्यक बाब आहे,कारण मुलांमधील समस्या कळल्यावर त्याला केव्हा आणि कसं समुपदेशकाकडे पाठवायचं आणि त्यापुढची जबाबदारी कशी निभवायची ह्याचं  भान आणि ज्ञान त्यांना असणं  फार आवश्यक आहे.  बरेचदा शिक्षक जबाबदारी ढकलून देण्याच्या किंवा दुर्लक्ष करण्याच्या मनोवृत्तीचे असतात ती मानसिकता घालवून त्यांच्या समान जबाबदारीची जाणीव त्यांना करून द्यावी लागते. 
पालकांच्याही काही निराळ्या समस्या असू शकतात त्यामुळेच मुल आणि पालक यांच्यात सुसंवादाची कमतरता हा एक महत्वाचा प्रश्न सतत समोर असतो.
त्यामुळे पालकांशीही योग्य प्रकारे संवाद साधून मुलांच्या वागणुकीमागची कारणं शोधणं खूप महत्वाचं ठरतं. 
अशा पद्धतीने मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संबंधित घटकांशी सतत संवाद आणि त्यातून योग्य,सकारात्मक बदलाकडे वाटचाल हे समुपदेशकाच   महत्वाच कर्तव्य आणि महत्वाची भूमिका आहे. 

Sunday, March 11, 2012

अबोल तरी बोलकं असं काही..

कोणी सांगितलंय, नेहमीच
   शब्दातूनच व्यक्त होते भावना? 
कोण म्हणतं, नेहमीच
    बोलूनच सांगता येतं काही? 
                                                                               
थेंब स्पर्श केवळ पुरेसा धरेला 
जेव्हा अबोल पावसाची येते सर 
मृद-गंधाचा साज धरेला 
जेव्हा जुळतो तिचा-त्याचा स्वर  


भावस्वर हाच गाभा गीताचा  ,
ईश्वराच्या तो अगदी नजीकचा..
छेडल्या  जाउनी  सुरेल तारा,
नाद व्यापतो मनाचा गाभारा..


नाद असतो तेव्हाच सुरांची वीण घट्ट होते,
कृष्ण्सखी  राधा त्या वंशीनादातच नादावून जाते..
कृष्ण आणि बासरीचा नाद यात अंतरच राहत नाही,
अगदी तसाच..कृष्ण आणि राधा यातही फरकच उरत नाही..


सुराला नादाची ओढ आणि शब्दाला गीताची,
नात्याला जवळीक जशी भावनांची..
भावनेची वीण म्हणजेच नात्याचा खरा अविष्कार,
नकळत  उमगणारा मनातला हळुवार हुंकार..   







Tuesday, January 17, 2012

उत्सव मनातला..

माणसाचं मन हे मूलतःच खूप संवेदनशील आहे. आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे,प्रसंगांमुळे निर्माण होणारे विचार,भावना नेहमीच मनाचा गाभा व्यापून टाकतात. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन भिन्न असल्यामुळे त्या त्या प्रकारे माणसाला आनंद किंवा दुःख होत असतं. आपल्या मनाच्या कॅनव्हासवर कसं चित्र रेखाटायच हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. या सर्व गोष्टींमध्ये सामायिक गोष्ट हीच असते कि प्रत्येकाला सुख,समाधान,शांती हवी असते. अहंकार, हेवेदावे, स्पर्धा यांसारख्या विकारांच्या कोशात जो अडकतो तो निर्मळ, शुद्ध आनंदाप्रत कधीच पोहोचू शकत नाही.
     "उत्सवी मन" ही संकल्पना मला हे लिहिता लिहिता गवसली आणि लगेच आवडली पण.
असं मन प्रत्येकात आहे पण त्याचा ध्यास लागायला हवा. आजकाल कृत्रिम उपभोगात अडकेला माणूस उत्सवाचाही आनंद पूर्णपणे घेऊ शकत नाही.
         साधं उदाहरण, लहान मुलांशी खेळताना, त्यांच्याशी बोलताना वयाने मोठी माणसं लहान होऊच शकत नाहीत. कसा घेणार आनंद त्या बालवयाचा आणि बाल लीलांचा!! जोपर्यंत मी कुणी वेगळा आहे,मी दुसऱ्याला शहाणं करण्यासाठी, शिकवण्यासाठी जन्माला आलो आहे ही भावना मनातून जात नाही, तोवर छोट्या छोट्या गोष्टीत कसं सौंदर्य सापडणार आणि मन त्याचा आस्वाद तरी कसा घेणार?
           परवाचीच एक गोष्ट, शिवाजी पार्कच्या मैदानात शाळेतल्या मुलांचा बालदिन साजरा होत होता. रंगीबेरंगी कपडे घातलेली, नटलेली ती चिमुकली खूप गोड दिसत होती. समारंभ असला तरी शिस्तीत कुठेही कमतरता नव्हती.पालक आपल्याच मुलांना नव्याने, पुन्हापुन्हा न्याहाळत होते. डोळ्यात मुलांसाठीच प्रेम आणि कौतुक होतं. आपले आई बाबा आपल्याला पाहतायेत त्यामुळे मुलांच्यात संचारलेला उत्साह पाहून खरंच सगळं गोकुळ वाटत होतं! गोकुळ म्हणजे हेच, जे आपल्याच मनात नांदत असतं आणि वेळोवेळी या विश्वाच्या सौंदर्याची, मोहकतेची जाणीव जागती ठेवत असतं तेच.असं वाटलं क्षणभर! अशा क्षणी मनाच्या स्वच्छ कॅनव्हासवर एक मनमोहक चित्र रेखाटलं जातंय असं वाटत. तिथे कोणत्याही कृत्रिम भावनांना,
नकारात्मकतेला जागाच उरत नाही. असं होण्यासाठी मात्र माणसाने सौंदर्याचा, समाधानी वृत्तीचा ध्यास घ्यावा लागतो, नाहीतर आधी उल्लेखिलेल्या विकारांना जागा व्यापण्यास वेळ लागत नाही.
             एकदा एका खूप वयोवृद्ध आजींना भेटायला गेले होते. घरात दोन बायका त्यांना सांभाळण्यासाठी.
सगळी काम करण्यासाठी नोकर, पण आपुलकीने, प्रेमाने बोलणारच कुणी नाही. घरातल्या व्यक्तींना काय, हे
 हे रडगाणं नेहमीचाच!  "रडगाणं" हा त्यांचा शब्द बर का! माझा नाही. माणूस वयोवृद्ध होतो म्हणजे काय, तो डोक्याने कमी किंवा निरुपयोगी होत नाही, किंबहुना त्याच्या भाव-भावना तशाच असतात. उलट आपण त्याचं वृद्धपण स्विकारून त्यांच्या मनाच कोवळेपण, साधेपण जपायचं असतं. तर, मी घरी गेल्यावर त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या, त्या पण मोकळ्या मनाने प्रतिसाद देत होत्या. शब्द सगळेच कळत होते असं नाही पण भाव
माझ्यापर्यंत पोहोचत होते. निघताना माझा हात घट्ट धरूनच ठेवला कितीतरी वेळ ! तो घट्ट स्पर्श एकटेपणाची जाणीव करून देत होता . मला वाईट वाटलं त्यांच्या त्या अवस्थेच पण अत्यंत समाधान वाटलं यामुळे की, मी माझ्या आयुष्यातला कणभर वेळ मी एका आजींच एकटेपण कमी करण्यासाठी सत्कारणी लावला. हा मनाचा एक वेगळा रंग, जो दुसऱ्याच रंगहीन आयुष्य रंगमय करू शकतो.
             मनातला उत्सव तोच, जो आपलं जगणं तर सुंदर करतोच पण इतरांच्या जगण्यातला एक  भाग बनून त्याचं आयुष्यही मोहरवून टाकतो..
              यावेळी पु.लं. च एक वाक्य आठवतं -
               " जन्म आणि मृत्यू यांमधल्या अंतरामुळे माणसाची चाललेली फसवणूक माणसाला
                  सहनीय व्हावी यासाठीच माझा हा हसवणुकीचा प्रपंच..!"  केवढं महत्वाच तत्वज्ञान!! यासारखं  
उत्सवी मनाचं किंवा मानसिकतेच उदाहरण दुसरं कुठलंच असू शकत नाही.
  "समोरच्याचं जगणं जगू  शकू तेव्हाच आपल्या आणि त्याच्या आयुष्यात वसंत बहरेल आणि उत्सवाला उधाण आल्याशिवाय राहणार नाही..!!"




















Wednesday, September 7, 2011

परिवार संकल्पना

"हे विश्वची माझे घर" , "चिंता करितो विश्वाची" हे   अनुक्रमे संत ज्ञानेश्वरांचे आणि संत रामदासांचे उद्गार सुपरिचित आहेतच. हे महात्मे असे होते ज्यांनी संपूर्ण समाजालाच आपलं  समजून प्रत्येक घटकालाच आपले सगे-सोयरे करून सतत त्यांच्यासाठीचाच विचार केला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी तर पसायदान रुपी  परमपवित्र मागणं या विस्तृत समाजासाठीच तर मागितलं आणि शिवाय समाजातले जे वाईट चालीरीतींचे, विचारांचे लोक आहेत त्यांची भ्रष्ट झालेली बुद्धी सत्कर्मासाठी जास्तीत जास्त कारणी लागो ज्याद्वारे आपोआप त्यांच्या गैर मार्गाने जाणाऱ्या बुद्धीचे रुपांतर सद्बुद्धीत होईल असं दान देवाकडे मागितलं ज्यात सकल समाजाचं हित आहे. 
                                                     "जे खळांची व्यंकटी सांडो,
                                                       तया सत्कर्मी रति वाढो"
असं मागणं तेव्हाच मागितलं जातं जेव्हा समस्त समाजाला त्याच्या गुण-दोषांसह आपण स्वीकारतो. 
"परिवार" ही संकल्पना आपण या महात्म्यांकडून शिकावी आणि आचरणात आणावी असं वाटतं. 
सामान्य माणसांच्या आयुष्यात "कुटुंब" ही एक सीमित, मर्यादित संकल्पना असते; जिथे केवळ "माझं घर",
"माझ्या घरातली माणसं", "त्यांची सुख-दुःख", "त्यांचं यश-अपयश" या गोष्टींचाच बहुतेकदा विचार असतो. 
हीच संकल्पना अधिक व्यापक होऊन त्याचं रुपांतर अशा एका भव्य सूत्रात व्हायला हवा, ज्यायोगे, व्यक्ती-व्यक्तींमधला आप्तभाव, परस्परांबद्दलची संवेदनशीलता वाढीस लागेल.
             "कुटुंब" हा आपल्या समाज रचनेतला एक पायाभूत घटक. कुटुंबातूनच व्यक्ती समाजात वावरण्यासाठी 
सक्षम होत असते. संस्कार, नियम, योग्य-अयोग्य या सर्व गोष्टी व्यक्तीला कुटुंबातच प्रथम शिकायला मिळतात; त्यामुळे व्याक्तीविकासासाठी कुटुंब ही एक मुलभूत रचना आहेच, परंतु, या व्याक्तीविकासाच्या शृंखलेत व्यक्तीचे समाजाप्रती दायित्व हा एक महत्वाचा घटक अंतर्भूत असायला हवा. या घटकामुळे व्यक्तीचा प्रवास कुटुंबाकडून अधिक विस्तृत समष्टी परिवाराकडे आणि मग विश्व कल्याणाकडे होईल.
              हा विषय मांडताना हेच सूत्र मनात ठेवलं, ते म्हणजे "परिवार" ही एक व्यापक संकल्पना आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीने अंगी बाणवावी, कारण, संकल्पनेच्या आधीही ती एक "मानसिकता" आहे जी व्यक्तीला त्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करते. 
काही व्यक्तींच्या आयुष्यात असे परिवार निर्माण होतात ज्यात त्यांनी केवळ स्वतःचा विचार, केवळ स्वतःच्या आप्तस्वकीयांचा विचार न करता त्याहीपेक्षा व्यापक कुटुंबाचा विचार केलेला असतो आणि ती व्यक्ती त्या परिवारातच एवढी समरस होते कि तिचं असं वेगळं अस्तित्व भासतच नाही. 
आता स्व.बाबा आमटेंच्या आनंदवनाच उदाहरण! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या सहाय्याने समाजातल्या एवढ्या दुर्लक्षित घटकांसाठी काम करणं ज्यांना समाज स्वीकारायलाच काय पण स्पर्श करायलाही तयार नाही..! केवढी हि तपस्या!!  
ही तपस्या यशस्वी होण्यात त्यांनी आपल्या कुटुंबावर केलेल्या समाजसेवेच्या संस्कारांचा मोलाचा वाटा आहे.
असे संस्कार कुटुंबाच्या स्तरावर करून विस्तृत परिवार कल्याणाच बीज अंकुरित होण्यास फारसा अवधी लागणार नाही.
अशा अनेक परिवारांची निर्मिती समाजातील प्रत्येक घटकाला परिस स्पर्श करणारी अशी एक शक्ती ठरू शकते.
माणसाच्या मनाची व्यापकता जेवढ अधिक तेवढी ती शक्ती जास्त आणि ती शक्ती जेवढी जास्त सर्वव्यापी तेवढी कार्याची व्यापकता अधिक..अशा तर्हेने ही शृंखला अबाधित ठेवल्यास प्रत्येक व्यक्ती कार्यप्रवृत्त होण्यास वेळ लागणार नाही आणि संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाला खरा अर्थ लाभेल आणि त्या दानासाठी आपण पात्र ठरू.