Sunday, May 8, 2011

उंबरठा....

उंबरठा किंवा उंबरा म्हंटल कि डोळ्यासमोर येते ती सुंदर रंगसंगती करून घरातल्या गृहिणींनी  काढलेली रांगोळी!! 
पूर्वीच्या काळी किंवा आत्ताही काही घरांमधून रोज सकाळी स्नान करून शुचिर्भूत होऊन अंगण (जेवढे असेल तेवढे) सजवण्याची पद्धत जपली जाते. या रंगोलीमागचे कारण असे सांगितले जाते कि, आपल्या घराला बाहेरच्या दुष्ट प्रवृत्तींपासून त्रास होऊ नये म्हणून रांगोळीने एक मर्यादा दाखविली जाते, जेणेकरून ते कुटुंब बाहेरील अपप्रवृत्तींपासून सुरक्षित राहील. इतकी महत्वाची जबाबदारी हा घराचा उंबरठा पेलत असतो. 
याप्रमाणेच, माणसाने आपल्या मनात देखील एक उंबरठा रचलेला असतो असा वाटत, ज्यालाच आपण त्या माणसाने स्वतःवर घालून घेतलेल्या मर्यादा म्हणतो. अनेकदा माणसं या मर्यादांची कारणं देतात, एखादे काम न करण्यासाठी. यामुळे त्या मर्यादा कार्याला मदतीच्या न ठरत "अडचण" म्हणून उभ्या ठाकतात. 
"उंबरठा" हे परिवर्तनाचे एक प्रतिक आहे असा मला वाटत. जे आहे त्यात विधायक बदल घडून येऊ शकतो, जेव्हा "उंबरठा" उल्लंघून कोणी काही करतं तेव्हा!! 
आपले वैयक्तिक उंबरठे सांभाळणारे अनेक जण भेटतील,पण ते ओलांडून भोवताली पसरलेल्या विश्वाचे "उंबरठे" सुरक्षित आहेत कि नाही हे पाहण्यासाठी कष्टणारे खूप कमी!! जोपर्यंत आपण आपलं अंगण कधीतरी सोडून पाहत नाही, तोवर आपल्याला आपल्याच बांधवांच्या अंगणाचा विचार करताच येणार नाही. यासाठी माणसांनी आपल्या मनाची संकुचित कवाडं अजून व्यापक करण्याची गरज आहे.  
यावेळी आठवण होते ती सीमेवर लढणाऱ्या जवानांची! देशाच्या उंबरठ्याच्या संरक्षणासाठी लढत असतात ते. त्यांना नसतात स्वतःच्या घराचे उंबरठे? नसते चिंता घरच्यांची? पण मनात असते प्रचंड जिद्द आणि देशाचा सततचा विचार! हेच बळ असते त्यांच्या सीमेवर राहण्यामागे! ती खरी उम्बर्याची पूजा असं म्हणेन मी! स्वतःच्या घराच्या आणि देशाच्याही! मनातल्या दुर्दम्य इच्छेने बाहेर पडलेले ते वीर, त्यांच्या कामाने कुटुंबालाच धन्य धन्य करून टाकतात आणि कुटुंबालाही तेजाची झळाळी बहाल करतात.
यावेळी स्वा .सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना आपल्या पत्नीशी बोलताना सांगितलेली काही वाक्य आठवतात, जी  कायम पूजनीय आहेत. 
    " कावळे-चिमण्याही संसार करतातच आहेत. पण संसाराचा याहूनही भव्यतर अर्थ घ्यायचा असेल तर 
      आपल्यामुळे कदाचित उद्या हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल." 
केवढा व्यापक विचार! आपल्या पत्नीचा, कुटुंबाचा एवढा मोठा वियोग होत असताना सुद्धा मन योद्ध्याच असेल तरच असे विचार आणि कृती होऊ शकते. 
हे आठवण्याचे कारण हेच कि, "उंबरठा" ओलांडण्याच धारिष्ट्य माणसाला समृद्ध तर करताच पण समाजाला अमुल्ल्या असं वरदान देऊन जातं. 
आपण जीवनामध्ये , स्वा .सावारानेव्ढे मोठे नसलो तरी वैयक्तिक विचारांच्या मर्यादा ओलांडून विधायक कार्य पूर्तीसाठी बाहेर पडण्याची जिद्द तरी नक्कीच बाळगायला हवी आणि त्या दृष्टीने कृती करायला हवी. 
                       "समाज जीवन भरुनी टाकू 
                        चैतन्याने-मानाने!
                        वैभवशाली भवितव्याला 
                        नटवू निज कर्तृत्वाने"

या ओळीच या माझ्या भावनेचं चपखल वर्णन करू शकतील...

Saturday, May 7, 2011

मन...तेजाचे राऊळ !!

        हा विषय अनेक दिवस मनात होता, पण तो कसा शब्दात पकडावा हाच  प्रश्न पडला  होता. पण आज कुठेतरी गवसलाय असा वाटतंय. विषयाचा मूळ गाभा म्हंटला तर तो आहे "माणसाचं मन आणि त्याचा व्यापक विचार ''
        प्रत्येकाच्या मनाचे,व्यक्तिमत्वाचे अनेक पदर आपण पाहत असतो. विचारांच्या बैठकीवर मन विकसित होत असतं. मन विकसित होत असताना प्रत्येकाचा एक भावनिक विश्व नर्माण होत असतं आणि त्यावर त्याच्या व्यक्तिमत्वाची इमारत रचली जात असते. आता भावनिक विश्व म्हंटल्यावर केवळ त्यात "भावनांचा" समावेश नसतो तर "अस्तित्वाचा" ठाव घेण्याची सततची इच्छा असते. "अस्तित्व" माणसाला कोणीतरी "असण्याची" जाणीव करून देणारा माणसाचा एक "रक्षक" आहे असं वाटतं. तो रक्षक सतत बजावत असतो,"प्रत्येक गोष्टीत तुझा असं काय आहे ते आजमावून पहा तरच तू या विश्वाचा एक भाग म्हणून ओळखला जाशील."  
        आता हे अस्तित्व कोणासाठी? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. एक "अस्तित्व" जेव्हा दुसर्याला त्याचा "अस्तित्व" बहाल करण्यासाठी निरांजनाच्या ज्योतीप्रमाणे जळत ते केवळ "अस्तित्व'' राहत नाही तर दुसऱ्याची "प्रेरणा" होतं. ती प्रेरणा कधीही न संपणारी, न थांबणारी आणि प्रसिद्धीला सुद्द्धा छोटा करेल अशी चिरंतन असते. 
         अशी दुसऱ्याच्या "अस्तित्वाची" चिंता करणारे जेवढे अधिक तेवढा हा समाज अधिकाधिक उन्नत होण्यास वेळ लागणार नाही. यावेळी एका गीताच्या ओळी आठवतात -
                          "सज-धजकर आए आकर्षण, पग पग पर झूमते  प्रलोभन 
                             होकर सबसे विमुख बटोही, पथ पर संभल-संभल बढ़ता है
                            जीवन भर अविचल चलता है" 

हे वर्णन आशा माणसांचं आहे, ज्यांचं तेल, वात आणि प्रकाश हा समाजातील दुर्लक्षित, सुशिक्षित असून असंस्कारित अशा घटकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठीच प्रेरणादायी ठरतो. यामुळे होतं एवढंच की, त्यांचे सत्कार होत नाहीत, हारतुरे घातले जात नाहीत, तर त्यांची मनच "तेजाची राऊळे " होतात ती इतकी की,त्या प्रकाशाला अंत नसतो, जो चिरंतन असतो, सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असतो. 
              फुलाचा सुगंध जसा पसरल्याने वाढतो आणि प्रत्येकाला आनंदित, उत्साहित करतो त्याप्रमाणेच ही राउळे असतात, जी सर्वांना प्रकाशमय करून टाकण्यासाठीच आपलं अस्तित्व जपतात. 
                             " सुरभि लुटाता सुमन सिहरता
                               निर्जनता में भी खिलता है
                               जीवनभर अविचल चलता है"