Wednesday, September 7, 2011

परिवार संकल्पना

"हे विश्वची माझे घर" , "चिंता करितो विश्वाची" हे   अनुक्रमे संत ज्ञानेश्वरांचे आणि संत रामदासांचे उद्गार सुपरिचित आहेतच. हे महात्मे असे होते ज्यांनी संपूर्ण समाजालाच आपलं  समजून प्रत्येक घटकालाच आपले सगे-सोयरे करून सतत त्यांच्यासाठीचाच विचार केला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी तर पसायदान रुपी  परमपवित्र मागणं या विस्तृत समाजासाठीच तर मागितलं आणि शिवाय समाजातले जे वाईट चालीरीतींचे, विचारांचे लोक आहेत त्यांची भ्रष्ट झालेली बुद्धी सत्कर्मासाठी जास्तीत जास्त कारणी लागो ज्याद्वारे आपोआप त्यांच्या गैर मार्गाने जाणाऱ्या बुद्धीचे रुपांतर सद्बुद्धीत होईल असं दान देवाकडे मागितलं ज्यात सकल समाजाचं हित आहे. 
                                                     "जे खळांची व्यंकटी सांडो,
                                                       तया सत्कर्मी रति वाढो"
असं मागणं तेव्हाच मागितलं जातं जेव्हा समस्त समाजाला त्याच्या गुण-दोषांसह आपण स्वीकारतो. 
"परिवार" ही संकल्पना आपण या महात्म्यांकडून शिकावी आणि आचरणात आणावी असं वाटतं. 
सामान्य माणसांच्या आयुष्यात "कुटुंब" ही एक सीमित, मर्यादित संकल्पना असते; जिथे केवळ "माझं घर",
"माझ्या घरातली माणसं", "त्यांची सुख-दुःख", "त्यांचं यश-अपयश" या गोष्टींचाच बहुतेकदा विचार असतो. 
हीच संकल्पना अधिक व्यापक होऊन त्याचं रुपांतर अशा एका भव्य सूत्रात व्हायला हवा, ज्यायोगे, व्यक्ती-व्यक्तींमधला आप्तभाव, परस्परांबद्दलची संवेदनशीलता वाढीस लागेल.
             "कुटुंब" हा आपल्या समाज रचनेतला एक पायाभूत घटक. कुटुंबातूनच व्यक्ती समाजात वावरण्यासाठी 
सक्षम होत असते. संस्कार, नियम, योग्य-अयोग्य या सर्व गोष्टी व्यक्तीला कुटुंबातच प्रथम शिकायला मिळतात; त्यामुळे व्याक्तीविकासासाठी कुटुंब ही एक मुलभूत रचना आहेच, परंतु, या व्याक्तीविकासाच्या शृंखलेत व्यक्तीचे समाजाप्रती दायित्व हा एक महत्वाचा घटक अंतर्भूत असायला हवा. या घटकामुळे व्यक्तीचा प्रवास कुटुंबाकडून अधिक विस्तृत समष्टी परिवाराकडे आणि मग विश्व कल्याणाकडे होईल.
              हा विषय मांडताना हेच सूत्र मनात ठेवलं, ते म्हणजे "परिवार" ही एक व्यापक संकल्पना आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीने अंगी बाणवावी, कारण, संकल्पनेच्या आधीही ती एक "मानसिकता" आहे जी व्यक्तीला त्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करते. 
काही व्यक्तींच्या आयुष्यात असे परिवार निर्माण होतात ज्यात त्यांनी केवळ स्वतःचा विचार, केवळ स्वतःच्या आप्तस्वकीयांचा विचार न करता त्याहीपेक्षा व्यापक कुटुंबाचा विचार केलेला असतो आणि ती व्यक्ती त्या परिवारातच एवढी समरस होते कि तिचं असं वेगळं अस्तित्व भासतच नाही. 
आता स्व.बाबा आमटेंच्या आनंदवनाच उदाहरण! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या सहाय्याने समाजातल्या एवढ्या दुर्लक्षित घटकांसाठी काम करणं ज्यांना समाज स्वीकारायलाच काय पण स्पर्श करायलाही तयार नाही..! केवढी हि तपस्या!!  
ही तपस्या यशस्वी होण्यात त्यांनी आपल्या कुटुंबावर केलेल्या समाजसेवेच्या संस्कारांचा मोलाचा वाटा आहे.
असे संस्कार कुटुंबाच्या स्तरावर करून विस्तृत परिवार कल्याणाच बीज अंकुरित होण्यास फारसा अवधी लागणार नाही.
अशा अनेक परिवारांची निर्मिती समाजातील प्रत्येक घटकाला परिस स्पर्श करणारी अशी एक शक्ती ठरू शकते.
माणसाच्या मनाची व्यापकता जेवढ अधिक तेवढी ती शक्ती जास्त आणि ती शक्ती जेवढी जास्त सर्वव्यापी तेवढी कार्याची व्यापकता अधिक..अशा तर्हेने ही शृंखला अबाधित ठेवल्यास प्रत्येक व्यक्ती कार्यप्रवृत्त होण्यास वेळ लागणार नाही आणि संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाला खरा अर्थ लाभेल आणि त्या दानासाठी आपण पात्र ठरू.
  
  

Friday, June 24, 2011

नामंजूर ....!!

या लेखाला हे वेगळंच शीर्षक देण्याचं कारण हेच कि , माणसांच्या विचारांची अभिव्यक्ती/ठेवण उलगडून सांगणे.
आपल्या संस्कृतीने आपल्याला हेच शिकवलं कि, स्वतःचं हित-अहित जाणून स्वतःच्या उद्धाराबरोबरच स्वकोषातून बाहेर पडून समष्टीचा विचार करा आणि स्वक्षमतेचा  वापर समष्टी उद्धारासाठीसुद्धा करा. आजकाल माणसं ही संस्कृती विसरू लागल्येत कि काय असा वाटतं.  प्रत्येकजण "स्व" मध्ये एवढा गुंतलेला आहे कि त्याला आपला शेजारी आजारी आहे याचीदेखील कल्पना नसते. माणसाचं माणसाशी असलेलं नातं जिवंत न राहणं ही समाजासाठी फार घटक गोष्ट ठरेल. 
  आजकाल बाहेर वावरताना असंही दिसून येतं कि, माणसांना बाह्य आकार्षानांचा फार वेड आहे. मग अगदी स्वतःच्या मुलांना pubs, Discos मध्ये पाठवणं असेल, बड्या बड्या उपाहारगृहांमध्ये जाण्यासाठी पैसे देणं असेल..अशा अनेक गोष्टी!!!! केवळ STATUS चा भाग म्हणून आजकाल पालकसुद्धा या दुष्टचक्रात अडकलेले आहेत. रस्त्यावरून फिरताना अनेक Cafes, Junk food stalls उभे राहिलेले दिसतात जिथे आरोग्यासाठी पोषक नसणाऱ्या पदार्थांची विक्री होत असते. सगळी तरुण आणि लहान पिढी तिथेच घुटमळत असते, याचं कारण घरातून पालकांकडून सर्रासपणे पैसे मिळतात आणि त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे याचे दुष्परिणाम घराघरातून सांगितलेही जात नाहीत. 
   आता समस्त समाजाने या सर्व पाश्चात्त्य संस्कृतीला "नामंजूर!" असं खडसावून  सांगण्याची गरज आहे. 
आपल्या संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे माणसाच्या जीवनपद्धतीचे परिणाम त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर होत असतात, एवढी आपली भारतीय संस्कृती या बाबतीत प्रगल्भ आहे. प्रत्येक माणूस काय खातो,पितो, कसे कपडे घालतो, कोणत्या देवतेच पूजन करतो/त्या देवतेला मानतो या सर्व गोष्टी व्यक्तिमत्वाच्या उभारणीतील महत्वाचे पैलू असतात. 
आजकाल बोकाळलेल्या या सर्व तर्हेच्या पश्चात्त्यीकारणात भारतीय तरुण पिढी ज्या प्रगल्भतेची असायला हवी तितकी दिसत नाही, याच कारण हेच कि, येणाऱ्या बाह्य आकार्शानांकडे धाव घेण्याची मनोवृत्ती आणि पालकांचा मिळणारा दुजोरा अथवा मुले आणि पालक यांमधील सुसंवादाचा अभाव! 
  स्वामी विवेकानंदानी म्हंटल्याप्रमाणे , "भारत देश हा तरुणांचा देश असून, तरुणाईच्या कर्तृत्वावरच या देशाची ओळख सातासमुद्रापार जाणार आहे." या स्वामीजींच्या विचाराला, विश्वासाला, दूरदृष्टीला प्रत्येक तरुणाने आपल्या दैवताप्रमाणे मानून, मनात सतत या विचाराची जाण ठेवून वागण्याची आणि स्वतःसाठी घातक त्याचप्रमाणे आपल्या प्रिय समाजासाठी घातक गोष्टींना "नामंजूर!!" असा ठाम इन्कार देऊन प्रगतीकडे वाटचाल करण्याची गरज आहे.
                           "मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची,
                             येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर!!!"
या ओळी या भावनेला अधिक बळ देतील असा वाटतं. 

Sunday, May 8, 2011

उंबरठा....

उंबरठा किंवा उंबरा म्हंटल कि डोळ्यासमोर येते ती सुंदर रंगसंगती करून घरातल्या गृहिणींनी  काढलेली रांगोळी!! 
पूर्वीच्या काळी किंवा आत्ताही काही घरांमधून रोज सकाळी स्नान करून शुचिर्भूत होऊन अंगण (जेवढे असेल तेवढे) सजवण्याची पद्धत जपली जाते. या रंगोलीमागचे कारण असे सांगितले जाते कि, आपल्या घराला बाहेरच्या दुष्ट प्रवृत्तींपासून त्रास होऊ नये म्हणून रांगोळीने एक मर्यादा दाखविली जाते, जेणेकरून ते कुटुंब बाहेरील अपप्रवृत्तींपासून सुरक्षित राहील. इतकी महत्वाची जबाबदारी हा घराचा उंबरठा पेलत असतो. 
याप्रमाणेच, माणसाने आपल्या मनात देखील एक उंबरठा रचलेला असतो असा वाटत, ज्यालाच आपण त्या माणसाने स्वतःवर घालून घेतलेल्या मर्यादा म्हणतो. अनेकदा माणसं या मर्यादांची कारणं देतात, एखादे काम न करण्यासाठी. यामुळे त्या मर्यादा कार्याला मदतीच्या न ठरत "अडचण" म्हणून उभ्या ठाकतात. 
"उंबरठा" हे परिवर्तनाचे एक प्रतिक आहे असा मला वाटत. जे आहे त्यात विधायक बदल घडून येऊ शकतो, जेव्हा "उंबरठा" उल्लंघून कोणी काही करतं तेव्हा!! 
आपले वैयक्तिक उंबरठे सांभाळणारे अनेक जण भेटतील,पण ते ओलांडून भोवताली पसरलेल्या विश्वाचे "उंबरठे" सुरक्षित आहेत कि नाही हे पाहण्यासाठी कष्टणारे खूप कमी!! जोपर्यंत आपण आपलं अंगण कधीतरी सोडून पाहत नाही, तोवर आपल्याला आपल्याच बांधवांच्या अंगणाचा विचार करताच येणार नाही. यासाठी माणसांनी आपल्या मनाची संकुचित कवाडं अजून व्यापक करण्याची गरज आहे.  
यावेळी आठवण होते ती सीमेवर लढणाऱ्या जवानांची! देशाच्या उंबरठ्याच्या संरक्षणासाठी लढत असतात ते. त्यांना नसतात स्वतःच्या घराचे उंबरठे? नसते चिंता घरच्यांची? पण मनात असते प्रचंड जिद्द आणि देशाचा सततचा विचार! हेच बळ असते त्यांच्या सीमेवर राहण्यामागे! ती खरी उम्बर्याची पूजा असं म्हणेन मी! स्वतःच्या घराच्या आणि देशाच्याही! मनातल्या दुर्दम्य इच्छेने बाहेर पडलेले ते वीर, त्यांच्या कामाने कुटुंबालाच धन्य धन्य करून टाकतात आणि कुटुंबालाही तेजाची झळाळी बहाल करतात.
यावेळी स्वा .सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना आपल्या पत्नीशी बोलताना सांगितलेली काही वाक्य आठवतात, जी  कायम पूजनीय आहेत. 
    " कावळे-चिमण्याही संसार करतातच आहेत. पण संसाराचा याहूनही भव्यतर अर्थ घ्यायचा असेल तर 
      आपल्यामुळे कदाचित उद्या हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल." 
केवढा व्यापक विचार! आपल्या पत्नीचा, कुटुंबाचा एवढा मोठा वियोग होत असताना सुद्धा मन योद्ध्याच असेल तरच असे विचार आणि कृती होऊ शकते. 
हे आठवण्याचे कारण हेच कि, "उंबरठा" ओलांडण्याच धारिष्ट्य माणसाला समृद्ध तर करताच पण समाजाला अमुल्ल्या असं वरदान देऊन जातं. 
आपण जीवनामध्ये , स्वा .सावारानेव्ढे मोठे नसलो तरी वैयक्तिक विचारांच्या मर्यादा ओलांडून विधायक कार्य पूर्तीसाठी बाहेर पडण्याची जिद्द तरी नक्कीच बाळगायला हवी आणि त्या दृष्टीने कृती करायला हवी. 
                       "समाज जीवन भरुनी टाकू 
                        चैतन्याने-मानाने!
                        वैभवशाली भवितव्याला 
                        नटवू निज कर्तृत्वाने"

या ओळीच या माझ्या भावनेचं चपखल वर्णन करू शकतील...

Saturday, May 7, 2011

मन...तेजाचे राऊळ !!

        हा विषय अनेक दिवस मनात होता, पण तो कसा शब्दात पकडावा हाच  प्रश्न पडला  होता. पण आज कुठेतरी गवसलाय असा वाटतंय. विषयाचा मूळ गाभा म्हंटला तर तो आहे "माणसाचं मन आणि त्याचा व्यापक विचार ''
        प्रत्येकाच्या मनाचे,व्यक्तिमत्वाचे अनेक पदर आपण पाहत असतो. विचारांच्या बैठकीवर मन विकसित होत असतं. मन विकसित होत असताना प्रत्येकाचा एक भावनिक विश्व नर्माण होत असतं आणि त्यावर त्याच्या व्यक्तिमत्वाची इमारत रचली जात असते. आता भावनिक विश्व म्हंटल्यावर केवळ त्यात "भावनांचा" समावेश नसतो तर "अस्तित्वाचा" ठाव घेण्याची सततची इच्छा असते. "अस्तित्व" माणसाला कोणीतरी "असण्याची" जाणीव करून देणारा माणसाचा एक "रक्षक" आहे असं वाटतं. तो रक्षक सतत बजावत असतो,"प्रत्येक गोष्टीत तुझा असं काय आहे ते आजमावून पहा तरच तू या विश्वाचा एक भाग म्हणून ओळखला जाशील."  
        आता हे अस्तित्व कोणासाठी? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. एक "अस्तित्व" जेव्हा दुसर्याला त्याचा "अस्तित्व" बहाल करण्यासाठी निरांजनाच्या ज्योतीप्रमाणे जळत ते केवळ "अस्तित्व'' राहत नाही तर दुसऱ्याची "प्रेरणा" होतं. ती प्रेरणा कधीही न संपणारी, न थांबणारी आणि प्रसिद्धीला सुद्द्धा छोटा करेल अशी चिरंतन असते. 
         अशी दुसऱ्याच्या "अस्तित्वाची" चिंता करणारे जेवढे अधिक तेवढा हा समाज अधिकाधिक उन्नत होण्यास वेळ लागणार नाही. यावेळी एका गीताच्या ओळी आठवतात -
                          "सज-धजकर आए आकर्षण, पग पग पर झूमते  प्रलोभन 
                             होकर सबसे विमुख बटोही, पथ पर संभल-संभल बढ़ता है
                            जीवन भर अविचल चलता है" 

हे वर्णन आशा माणसांचं आहे, ज्यांचं तेल, वात आणि प्रकाश हा समाजातील दुर्लक्षित, सुशिक्षित असून असंस्कारित अशा घटकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठीच प्रेरणादायी ठरतो. यामुळे होतं एवढंच की, त्यांचे सत्कार होत नाहीत, हारतुरे घातले जात नाहीत, तर त्यांची मनच "तेजाची राऊळे " होतात ती इतकी की,त्या प्रकाशाला अंत नसतो, जो चिरंतन असतो, सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असतो. 
              फुलाचा सुगंध जसा पसरल्याने वाढतो आणि प्रत्येकाला आनंदित, उत्साहित करतो त्याप्रमाणेच ही राउळे असतात, जी सर्वांना प्रकाशमय करून टाकण्यासाठीच आपलं अस्तित्व जपतात. 
                             " सुरभि लुटाता सुमन सिहरता
                               निर्जनता में भी खिलता है
                               जीवनभर अविचल चलता है"