Saturday, May 7, 2011

मन...तेजाचे राऊळ !!

        हा विषय अनेक दिवस मनात होता, पण तो कसा शब्दात पकडावा हाच  प्रश्न पडला  होता. पण आज कुठेतरी गवसलाय असा वाटतंय. विषयाचा मूळ गाभा म्हंटला तर तो आहे "माणसाचं मन आणि त्याचा व्यापक विचार ''
        प्रत्येकाच्या मनाचे,व्यक्तिमत्वाचे अनेक पदर आपण पाहत असतो. विचारांच्या बैठकीवर मन विकसित होत असतं. मन विकसित होत असताना प्रत्येकाचा एक भावनिक विश्व नर्माण होत असतं आणि त्यावर त्याच्या व्यक्तिमत्वाची इमारत रचली जात असते. आता भावनिक विश्व म्हंटल्यावर केवळ त्यात "भावनांचा" समावेश नसतो तर "अस्तित्वाचा" ठाव घेण्याची सततची इच्छा असते. "अस्तित्व" माणसाला कोणीतरी "असण्याची" जाणीव करून देणारा माणसाचा एक "रक्षक" आहे असं वाटतं. तो रक्षक सतत बजावत असतो,"प्रत्येक गोष्टीत तुझा असं काय आहे ते आजमावून पहा तरच तू या विश्वाचा एक भाग म्हणून ओळखला जाशील."  
        आता हे अस्तित्व कोणासाठी? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. एक "अस्तित्व" जेव्हा दुसर्याला त्याचा "अस्तित्व" बहाल करण्यासाठी निरांजनाच्या ज्योतीप्रमाणे जळत ते केवळ "अस्तित्व'' राहत नाही तर दुसऱ्याची "प्रेरणा" होतं. ती प्रेरणा कधीही न संपणारी, न थांबणारी आणि प्रसिद्धीला सुद्द्धा छोटा करेल अशी चिरंतन असते. 
         अशी दुसऱ्याच्या "अस्तित्वाची" चिंता करणारे जेवढे अधिक तेवढा हा समाज अधिकाधिक उन्नत होण्यास वेळ लागणार नाही. यावेळी एका गीताच्या ओळी आठवतात -
                          "सज-धजकर आए आकर्षण, पग पग पर झूमते  प्रलोभन 
                             होकर सबसे विमुख बटोही, पथ पर संभल-संभल बढ़ता है
                            जीवन भर अविचल चलता है" 

हे वर्णन आशा माणसांचं आहे, ज्यांचं तेल, वात आणि प्रकाश हा समाजातील दुर्लक्षित, सुशिक्षित असून असंस्कारित अशा घटकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठीच प्रेरणादायी ठरतो. यामुळे होतं एवढंच की, त्यांचे सत्कार होत नाहीत, हारतुरे घातले जात नाहीत, तर त्यांची मनच "तेजाची राऊळे " होतात ती इतकी की,त्या प्रकाशाला अंत नसतो, जो चिरंतन असतो, सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असतो. 
              फुलाचा सुगंध जसा पसरल्याने वाढतो आणि प्रत्येकाला आनंदित, उत्साहित करतो त्याप्रमाणेच ही राउळे असतात, जी सर्वांना प्रकाशमय करून टाकण्यासाठीच आपलं अस्तित्व जपतात. 
                             " सुरभि लुटाता सुमन सिहरता
                               निर्जनता में भी खिलता है
                               जीवनभर अविचल चलता है"

2 comments:

  1. छान झालाय लेख. वेगळाच विषय. कित्येकांनी ही अशी तेजाची राउळे पाहिलीही नसतील.
    .
    "यामुळे होतं एवढंच की, त्यांचे सत्कार होत नाहीत, हारतुरे घातले जात नाहीत, तर त्यांची मनच "तेजाची राऊळे " होतात ती इतकी की,त्या प्रकाशाला अंत नसतो, जो चिरंतन असतो, सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असतो." खूप आवडलं!
    .
    लिहीत रहा.

    ReplyDelete
  2. वाह छान आहे लेख ..... संपूर्ण शुद्ध मराठीत लिहीलाय ("आजमावून" सोडल्यास )

    ReplyDelete