Thursday, August 9, 2012

शाळेत समुपदेशन कशासाठी???

                                             
शालेय जीवनात माणूस एक अत्यंत सुंदर, मनमोकळ आयुष्य जगत असतो. संस्कारक्षम वयामध्ये शाळेत होणारे संस्कार म्हणजे पुढल्या आयुष्यभराची शिदोरी असते. मानसिक आणि शारीरिक बदलांमधून या काळात प्रत्येकजण जात असतो. याच बदलाच्या काळामध्ये गरज असते ती चांगल्या मित्रांच्या संगतीची, शिक्षकांच्या आपुलकीची आणि पालकांच्या प्रेमाची! मनाला उत्तम शिस्त लावण्यासाठी पोषक वातावरण जसं घरी असायला हवं तसंच  शाळेतही असायला हवं कारण मित्र मंडळींचा आणि शिक्षकांचा खूप मोठा पगडा या वयात मुलांवर असतो. ते सांगतील तसंच करण्याकडे कल असतो. या सर्व प्रक्रियेमध्ये शिक्षकांचा आणि पालकांचा खूप मोठा वाटा तर असतोच पण त्यांच्यावर खूप महत्वाची जबाबदारीही असते. 
आजकाल असं दिसून येतं की, एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात आल्याने मुलाला आई,बाबा आणि एखादं भावंड एवढाच परिवार असतो. 
आई - बाबा तर नोकरीच्या कारणाने बरेचसे बाहेर, त्यामुळे मुलाशी घरात बोलायला, गप्पा मारायला दिवसभर कुणीच नाही अशी परिस्थिती असते.
आजकाल संस्कार शिबिरांमधून "आजीच्या गोष्टी'' असं वेगळं सत्र ठेवलं जातं! यावरूनच लक्षात येतं की आजीच  घरात नाही तर मुलाला आजीच्या गोष्टी मिळणार कुठून?  मुल शाळेमध्ये येतं तेव्हा त्याने एका विशिष्ट शिस्तीतच वागणं अपेक्षित असतं, अभ्यास वेळेत पूर्ण करणं  अपेक्षित 
असतं नाहीतर शिक्षकांकडून ओरड होतेच..! म्हणजेच या सगळ्यात मुलांकडून फक्त "अपेक्षांची" ओझी वाहून घेतली जातात असं वाटतं. 
मुलांना अशी एक हक्काची जागा,जिथे  ती आपलं मन मोकळ करू शकतात, आपल्या अडचणी मोकळेपणी सांगू शकतात ती म्हणजे "समुपादेशानासाठीचे दालन "! 
 आता मुलांनी नुसतंच  येऊन समुपदेशकाशी गप्पा मारणं अपेक्षित आहे का? तर आहे पण त्या गप्पांमधून त्या मुलाची जी समस्या आहे तिला हात घालणं आणि त्यामुळे त्याच्या वर्तवणुकीत जे दोष निर्माण झालेले आहेत जे त्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या आड येताहेत किंवा
ज्यामुळे अन्य मुलांपेक्षा वेगळं असण्याची भावना त्याच्यामध्ये उत्पन्न झालेली आहे ती घालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे. 
''Psychotherapy"  च्या माध्यमातून बौद्धिक,भावनिक आणि वागणूक विषयक अपेक्षित सकारात्मक बदल हे काम समुपदेशकाने करणं आवश्यक आहे. 
खरं तर समुपदेशन हा पूर्ण प्रक्रियेचा खूप छोटा भाग आहे,त्यामुळे आजकाल ''school counselor''  ऐवजी ''school psychologist'' ही संकल्पना मूळ धरते आहे. मानस शास्त्रज्ञ हा मुलाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्व घटकांबरोबर( शिक्षक,पालक आणि संस्थाचालक) काम करणं अपेक्षित आहे.
मुलाच्या समस्येविषयी शिक्षकांना,पालकांना आणि मुख्याध्यापकांना जागरूक करणं हे त्याचं मुख्य काम आहे,जेणेकरून त्याविषयी हे सर्वजण सतर्क राहावेत असं अपेक्षित आहे. मूलतः शाळेतील मानस शास्त्रज्ञाने मुलं आणि अन्य संबंधित घटक यांमधील महत्वाचा दुवा बनून राहण्याची आवश्यकता आहे.  
सध्या शाळांमधून समुपदेशकाची नेमणूक होत असली तरीही त्याच्या भूमिकेबद्दल अजूनही आपल्या समाजात खूप कमी जागरूकता आहे. त्याच्या भूमिकेविषयी संस्थांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं आवश्यक बाब आहे,कारण मुलांमधील समस्या कळल्यावर त्याला केव्हा आणि कसं समुपदेशकाकडे पाठवायचं आणि त्यापुढची जबाबदारी कशी निभवायची ह्याचं  भान आणि ज्ञान त्यांना असणं  फार आवश्यक आहे.  बरेचदा शिक्षक जबाबदारी ढकलून देण्याच्या किंवा दुर्लक्ष करण्याच्या मनोवृत्तीचे असतात ती मानसिकता घालवून त्यांच्या समान जबाबदारीची जाणीव त्यांना करून द्यावी लागते. 
पालकांच्याही काही निराळ्या समस्या असू शकतात त्यामुळेच मुल आणि पालक यांच्यात सुसंवादाची कमतरता हा एक महत्वाचा प्रश्न सतत समोर असतो.
त्यामुळे पालकांशीही योग्य प्रकारे संवाद साधून मुलांच्या वागणुकीमागची कारणं शोधणं खूप महत्वाचं ठरतं. 
अशा पद्धतीने मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संबंधित घटकांशी सतत संवाद आणि त्यातून योग्य,सकारात्मक बदलाकडे वाटचाल हे समुपदेशकाच   महत्वाच कर्तव्य आणि महत्वाची भूमिका आहे. 

2 comments:

  1. समुपदेशनाबद्दल तशी काहीच माहिती आजवर नव्हती. या लेखातून त्याची गरज अधोरेखित होते.
    एकत्र कुटुंब पद्धतीचे मोडकळीस येणे, शिक्षकांचे त्यांच्या पेशाकडे केवळ एक नोकरी म्हणून पाहणे, आई - वडिलांचे नोकरी काम निमित्ताने बाहेर राहणे, मनोरंजनाचे आयाम बदलणे, कार्टून/सिनेमा/मालिका यातून मुलांना निकृष्ट गोष्टी मिळणे या सर्वाचा परिपाक एक कमजोर पिढी घडण्यात होतो आहे.
    समुपदेशक योग्य रीतीने काम करेल तर तो या सर्वांवर एक औषधी ठरू शकेल.
    समुपदेशकाचे काम प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  2. धन्यवाद विक्रम...! काम करताना खरच वाटतं की, मुलांचा दोष या सगळ्यात फारच कमी असतो.कारणीभूत असतात ते हे सगळे घटक..त्यांच्यात परिवर्तन झालं की मुलांच्या वर्तनात नक्कीच सकारात्मक फरक पडतो. आपल्या मुलाला आहे तसं स्वीकारणं आणि त्याच्या प्रगतीसाठी
    त्याच्यातला स्वाभिमान जागा ठेवण्याचं कर्तव्य शिक्षकांचं आणि पालकांचं आहे..
    तुझ्या प्रतिक्रिया नेहमीच अजून लिहायला प्रवृत्त करतात..!!

    ReplyDelete