Tuesday, January 17, 2012

उत्सव मनातला..

माणसाचं मन हे मूलतःच खूप संवेदनशील आहे. आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे,प्रसंगांमुळे निर्माण होणारे विचार,भावना नेहमीच मनाचा गाभा व्यापून टाकतात. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन भिन्न असल्यामुळे त्या त्या प्रकारे माणसाला आनंद किंवा दुःख होत असतं. आपल्या मनाच्या कॅनव्हासवर कसं चित्र रेखाटायच हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. या सर्व गोष्टींमध्ये सामायिक गोष्ट हीच असते कि प्रत्येकाला सुख,समाधान,शांती हवी असते. अहंकार, हेवेदावे, स्पर्धा यांसारख्या विकारांच्या कोशात जो अडकतो तो निर्मळ, शुद्ध आनंदाप्रत कधीच पोहोचू शकत नाही.
     "उत्सवी मन" ही संकल्पना मला हे लिहिता लिहिता गवसली आणि लगेच आवडली पण.
असं मन प्रत्येकात आहे पण त्याचा ध्यास लागायला हवा. आजकाल कृत्रिम उपभोगात अडकेला माणूस उत्सवाचाही आनंद पूर्णपणे घेऊ शकत नाही.
         साधं उदाहरण, लहान मुलांशी खेळताना, त्यांच्याशी बोलताना वयाने मोठी माणसं लहान होऊच शकत नाहीत. कसा घेणार आनंद त्या बालवयाचा आणि बाल लीलांचा!! जोपर्यंत मी कुणी वेगळा आहे,मी दुसऱ्याला शहाणं करण्यासाठी, शिकवण्यासाठी जन्माला आलो आहे ही भावना मनातून जात नाही, तोवर छोट्या छोट्या गोष्टीत कसं सौंदर्य सापडणार आणि मन त्याचा आस्वाद तरी कसा घेणार?
           परवाचीच एक गोष्ट, शिवाजी पार्कच्या मैदानात शाळेतल्या मुलांचा बालदिन साजरा होत होता. रंगीबेरंगी कपडे घातलेली, नटलेली ती चिमुकली खूप गोड दिसत होती. समारंभ असला तरी शिस्तीत कुठेही कमतरता नव्हती.पालक आपल्याच मुलांना नव्याने, पुन्हापुन्हा न्याहाळत होते. डोळ्यात मुलांसाठीच प्रेम आणि कौतुक होतं. आपले आई बाबा आपल्याला पाहतायेत त्यामुळे मुलांच्यात संचारलेला उत्साह पाहून खरंच सगळं गोकुळ वाटत होतं! गोकुळ म्हणजे हेच, जे आपल्याच मनात नांदत असतं आणि वेळोवेळी या विश्वाच्या सौंदर्याची, मोहकतेची जाणीव जागती ठेवत असतं तेच.असं वाटलं क्षणभर! अशा क्षणी मनाच्या स्वच्छ कॅनव्हासवर एक मनमोहक चित्र रेखाटलं जातंय असं वाटत. तिथे कोणत्याही कृत्रिम भावनांना,
नकारात्मकतेला जागाच उरत नाही. असं होण्यासाठी मात्र माणसाने सौंदर्याचा, समाधानी वृत्तीचा ध्यास घ्यावा लागतो, नाहीतर आधी उल्लेखिलेल्या विकारांना जागा व्यापण्यास वेळ लागत नाही.
             एकदा एका खूप वयोवृद्ध आजींना भेटायला गेले होते. घरात दोन बायका त्यांना सांभाळण्यासाठी.
सगळी काम करण्यासाठी नोकर, पण आपुलकीने, प्रेमाने बोलणारच कुणी नाही. घरातल्या व्यक्तींना काय, हे
 हे रडगाणं नेहमीचाच!  "रडगाणं" हा त्यांचा शब्द बर का! माझा नाही. माणूस वयोवृद्ध होतो म्हणजे काय, तो डोक्याने कमी किंवा निरुपयोगी होत नाही, किंबहुना त्याच्या भाव-भावना तशाच असतात. उलट आपण त्याचं वृद्धपण स्विकारून त्यांच्या मनाच कोवळेपण, साधेपण जपायचं असतं. तर, मी घरी गेल्यावर त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या, त्या पण मोकळ्या मनाने प्रतिसाद देत होत्या. शब्द सगळेच कळत होते असं नाही पण भाव
माझ्यापर्यंत पोहोचत होते. निघताना माझा हात घट्ट धरूनच ठेवला कितीतरी वेळ ! तो घट्ट स्पर्श एकटेपणाची जाणीव करून देत होता . मला वाईट वाटलं त्यांच्या त्या अवस्थेच पण अत्यंत समाधान वाटलं यामुळे की, मी माझ्या आयुष्यातला कणभर वेळ मी एका आजींच एकटेपण कमी करण्यासाठी सत्कारणी लावला. हा मनाचा एक वेगळा रंग, जो दुसऱ्याच रंगहीन आयुष्य रंगमय करू शकतो.
             मनातला उत्सव तोच, जो आपलं जगणं तर सुंदर करतोच पण इतरांच्या जगण्यातला एक  भाग बनून त्याचं आयुष्यही मोहरवून टाकतो..
              यावेळी पु.लं. च एक वाक्य आठवतं -
               " जन्म आणि मृत्यू यांमधल्या अंतरामुळे माणसाची चाललेली फसवणूक माणसाला
                  सहनीय व्हावी यासाठीच माझा हा हसवणुकीचा प्रपंच..!"  केवढं महत्वाच तत्वज्ञान!! यासारखं  
उत्सवी मनाचं किंवा मानसिकतेच उदाहरण दुसरं कुठलंच असू शकत नाही.
  "समोरच्याचं जगणं जगू  शकू तेव्हाच आपल्या आणि त्याच्या आयुष्यात वसंत बहरेल आणि उत्सवाला उधाण आल्याशिवाय राहणार नाही..!!"




















2 comments:

  1. स्फुट प्रकाराचा हा एक उत्तम नमुना झालाय. थोडक्या शब्दात, आशयघन विषयप्रस्तुती ही सोपी गोष्ट नाही.
    'उत्सवी मन' ही संकल्पना मनात रुजते जणू आणि लेख वाचून झाल्यावरही रुंजी घालत राहते...

    ReplyDelete
  2. @ vikram तू दिलेली प्रतिक्रिया आवडली. तुझ्या निरीक्षणातून मलाही एक गोष्ट शिकता आली, की, विषय कितीही गहन आणि महत्वाचा असो पण
    सहजपणे झालेलं लेखन, सुचलेल्या संकल्पना आनंद देऊन जातात..आणि त्याच तो मोठा विषय सहजपणे मनाला भिडवतात...

    ReplyDelete